नैतिक मुल्यांच्या जोपासनेची इस्लाम अपेक्षा करतो

सय्यद सालार पटेल
9225525921

इस्लामचा शाब्दिक अर्थ आज्ञापालनार्थ मान तुकविणे व स्वत:ला स्वाधीन करणे असा होतो. जेव्हा हा शब्द विशिष्टपणे अल्लाहच्या हुजूरात विनम्र होणे होय. आपल्या स्वत:ला त्याच्या स्वाधीन करणे असा होतो. दिव्य कुरआनने आपल्यासाठी प्रस्तुत केलेली जीवनपद्धती इस्लामने घोषित केली आहे.

अखिल मानवजातीचा धर्म पहिल्या मानवापासून नेहमी इस्लाम (अल्लाहची पूर्णपणे आज्ञाधारकता) राहिला आहे. पवित्र कुरआनने आपले आवाहन व आपला दीन (धर्म/ जीवन पद्धती) प्रेषित मुहम्मद सल्ललाहु अलैहि व सल्लम यांच्या वंश व राष्ट्राशीं संबंधित केलेले नाही. जीवनाचे प्रामुख्याने चार भाग केलेले आहेत. एक श्रद्धा व धारणा दूसरे उपासना विधी, तीसरे नैतिकता व चौथे मानवी व्यवहारासंबंधी नियम, मार्गदर्शन व आदेश.
इस्लामची नैतिकता धर्माचा सार आहे. मन मोहक आहे. मानवी वर्तनाशी साजेसे आहे, जोडलेले आहे. त्याच्या शिवाय मनुष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होवू शकत नाही किंवा चांगल्या समाजाची कल्पनासुद्धा करता येत नाही.
 1. अल्लाहची बंदगी - ज्या नैतिक मुल्यांची जोपासना इस्लाम करू पाहतो त्यात सर्वप्रथम स्थान अल्लाहची बंदगी, भक्ती, उपासना, आराधना आज्ञाधारकाता व प्रार्थना आहे.
नैतिक मुल्यांचा स्त्रोत अल्लाहच्या बंदगीत दडलेला आहे. कुरआन हा ग्रंथ व पैगंबराचे आवाहन जगवासियांसाठी स्पष्ट आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’लोक हो! बंदगी (आज्ञाधारकता) करा आपल्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वीच्यांनाही निर्माण केले. जेणे करून तुम्ही (दुष्कृत्यापासून) परावृत्त राहू शकाल. (कुरआन : 2 : 21.)
2) आई वडिलांशी सद्वर्तन - अल्लाहच्या इबादतीनंतर इस्लामने आई-वडिलांशी सद्वर्तनला सर्वात महत्त्वाचे स्थान दिले आहे. पवित्र कुरआनात वारंवार आई-वडिलांशी सद्वर्तनाची ताकीद करण्यात आलेली आहे. ”तुझ्या पालनकर्त्याने निर्णय दिलेला आहे की तुम्ही लोकांनी इतर कोणाचीही भक्ती करू नये परंतु फक्त त्याची. आई-वडिलांशी सद्वर्तन करा जर तुमच्यापाशी त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघे वृद्ध होवून राहिले तर त्यांच्यासमोर ’ब्र’ शब्द देखील काढू नका व त्यांना झिडकारून प्रत्युत्तर देखील देऊ नका तर त्यांच्याशी आदरपूर्वक बोला आणि नरमी व दयाद्रतेने त्यांच्या समोर नमून रहा आणि प्रार्थना करीत जा की हे पालनकर्त्या त्यांच्यावर दया कर ज्याप्रमाणे त्यांनी दया व वात्सल्याने बालपणी माझे संगोपन केले.” (कुरआन : 17:23:24).
3) अल्लाहच्या मार्गात खर्च करणे : अल्लाहच्या मार्गात खर्च करणे याचा अर्थ असा की अल्लाहच्या आज्ञापालनेत, त्याची प्रसन्नता प्राप्त व्हावी यासाठी अखिल मानवाच्या कल्याणार्थ केला जाणारा धन क्षमता, बुद्धी कौशल्य, ज्ञानाचा केला जाणारा उपयोग.
जकात हे इस्लामचे दूसरे स्तंभ आहे. ज्यावर इस्लामी जीवन शैली उभी आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात सदका, फित्रा आणि जिलहज्जच्या महिन्यात कुर्बानी करून समाजसेवा केली जाते. शिवाय जेंव्हा ईशप्रसन्नतेची संधी प्राप्त होईल त्यावेळी मनुष्याने आपली शक्ती खर्च करावी हे दान तर खर्या अर्थी फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि ज्या लोकांसाठी आहे ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच ते मान सोडविणे - गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व अल्लाहच्या मार्गात आणि वाटसरूच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्व काही जाणारा दृष्टा व बुद्धीमान आहे. (कुरआन 9:61).
4) अश्लीलतेपासून दूर रहाणे : अश्लीलता माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य आहे. मनुष्य व जनावरांमध्ये फरक माणुसकीचा आहे. इस्लामने अश्लीलतेला निषिद्ध अवैध ठरवले आहे. व्यक्ति, वंश व समाजाचे पावित्र्य व आबरू राखण्यासाठी अश्लीतेच्या जवळ सुद्धा फिरकू नका असे कुरआनात स्पष्ट सांगितलेले आहे. ’अश्लील गोष्टीच्या जवळपास देखील फिरकू नका. मग त्या उघड असोत अथवा गुपीत.’ (कुरआन 6:51) वंश व कुटुंब व समाज नष्ट करावयाचे असेल तर अश्लीलतेच समर्थन करावे.
6) मानवी जीविताची हत्या करणे निषिद्ध : मानवी जीवाची हत्या निषिद्ध केली गेली आहे. ईश्वरानंतर मानवाचे स्थान आहे. एकाचे जीव वाचविणे म्हणजे समस्त मानवजातीचे प्राण वाचविणे आहे. कुराणच्या शिकवणी तर स्पष्ट आहेत. ’ कुरआनम्धये ठिकाणी म्हटलेले आहे की, ’ज्याने एखाद्या माणसाला खुनाबद्दल अथवा पृथ्वीतलावर उपद्रव पसरविण्या व्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले त्याने सर्व मानवतेला ठार केले आणि ज्याने कोणाला जीवदान दिले त्याने जणूकाही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.’ (कुरआन 5:32).
7) अनाथांच्या संपत्तीजवळ जाऊ नका : अनाथाचे पालन पोषण, शिक्षण, संवर्ध करणे नातेवाईकांचे, कुटुंबाचे, समाजाचे शेवटी शासनाचे कर्तव्य आहे. जर त्यांची वडिलोपार्जित संपत्ती असेल तर त्याचे रक्षण करणे सर्वांचे कर्तव्य ठरते. ’आणि अनाथांच्या संपत्ती जवळ जाऊ नका. परंतु, अशा मार्गाने जो योग्य असेल येथ पावेतो की तो प्रौढत्व गाठील’ (कुरआन 6:152).
8) वचनाचे पालन : वचनाला महत्व आहे, वचनाशिवाय माणुसकीची कल्पना सुद्धा करता येत नाही. समाजाचे स्थैर्य वचनपुर्तीवर अवलंबून आहे. कुरआनने विस्तृत अशी व्यवस्था केली आहे. मानव आणि अल्लाह, मानव आणि मानव, मानव आणि सृष्टी यात वचनपालनाचा करार झाला आहे. मनुष्याने तो शेवटपर्यंत पाळला पाहिजे. कुरआनमध्ये ठिकठिकाणी स्पष्टपणे उच्चारले आहे’ वचनाचे पालन करा. नि:संशय वचनाबद्दल तुम्हाला जाब द्यावा लागेल. (कुरआन : 17:34).
8) वजन मापे न्यायपूर्ण रितीने करणे : सामाजिक स्थैर्यासाठी समाजात नैतिकतेची व कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य आहे. ज्यातून विकास साधला जावू शकतो. कुरआनने वजन, मापे याच्यामध्ये प्रामाणिकतेला महत्व दिलेले आहे. याच  कारणाने तराजुची दांडी न मारणे अशी शिकवण दिली आहे. प्रामाणिकपणावर एका समाजाची निर्मिती करून शासन सुद्धा करण्याचे पुरावे प्रेषितांच्या काळात आढळून येतात. कारण कुरआनने स्पष्टपणे बजावले होते, ’ वजन- माप न्यायपूर्ण रितीने करा. तराजुची दांडी मारू नका. (कुरआन : 55:9).
9) अज्ञान मुलक : भ्रामक कल्पनाचे अनुसरण न करणे  :कुरआनने ज्ञानाविना केवळ अनुमान व तर्क अथवा भ्रामक कल्पना किंवा इच्छा आकांक्षावर आपली इमारत उभी केली नाही तर फक्त ज्ञानावर केलेली आहे. कारण हे अल्लाहचे मार्गदर्शन आहे. ’ एखाद्या अशा गोष्टीच्या मागे लागू नका जिचेे तुम्हाला ज्ञान नसेल. निश्चितच डोळे, कान व हृदय या सर्वांकडे जाब विचारला जाईल. (कुरआन : 17:36).
10) अहंकार व घमेंड : व्यक्ती, समाज, शासक यांच्यावर संकट येण्याचे मूळ कारण अहंकारात दडले आहे. पूर्वीचे राष्ट्र समाप्त झाले. थोर व्यक्ती लयास गेल्या म्हणून कुरआने स्पष्ट सांगितले आहे कि, पृथ्वीवर घमेंडीत चालू नका, तुम्ही पृथ्वीला फाडू शकत नाही किंवा पर्वताच्या उंचीला गाठू शकत नाही. (कुरआन 17:37)
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Theme images by 5ugarless. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget