ईश्वराच्या अस्तित्व विषयासंबंधी निराधार प्रश्न

एखादे सुंदर, विविध रंगांच्या व विविध प्रकारच्या फुलांनी नटलेल्या नंदनवनात वावरत असताना आपल्या बुद्धीत नंदनवन फुलविणार्या व त्याची जोपासना करणार्या माळ्याविषयी विचार आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याने हे सुंदर नंदनवन फुलविण्याकरिता जमिनीची मशागत केली, पाणी देऊन सुपीक बनविली, कष्ट पणाला लावले आणि विविध प्रकारच्या फुलझाडांची कौशल्यपूर्ण पेरणी करून हे अतिसुंदर नंदनवन अस्तित्वात आणले. तसेच एखाद्या सुंदर आणि सुरचित इमारतीस पाहून किवा जगातील सर्वात सुंदर असलेल्या ताजमहालास पाहून आपल्या मनात निश्चितच इमारत तयार करणार्या कुशल कारागिराची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आपण ताजमहालाबरोबरच ताजमहालासाठी आपले पूर्ण कौशल्य पणाला लावणार्या त्या कुशल कारागिराची प्रशंसा करणारच. एखादे यंत्र अथवा संगणक पाहून आपण त्यांच्या निर्मात्याची मुक्तकंठाने प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही. एखादे सुंदर आणि व्यवस्थित वस्तुचे उत्पादन करणार्या मोठ्या कारखान्यास पाहिल्यावर कारखान्याच्या निर्माता व चालक असलेल्याची प्रशंसा केल्याशिवाय मनास शांतीच लाभत नाही.
मात्र या उलट एखाद्या सुंदर आणि रमणीय नंदनवनास पाहून जर कोणी म्हटले की, हे नंदनवन आपोआपच अस्तित्वात आले आणि या नंदनवनाच्या नीटनेटकेपणात कोणत्याही माळ्याची काहीच दखल नाही. तर ही गोष्ट जगातील कोणतीच व्यक्ती मान्य करणार नाही, किवा जर कोणी असा प्रश्न केला की, या नंदनवनाचा निर्माता असलेल्या माळ्यास एखाद्या फुलातून बाहेर काढून दाखवा, तर हा प्रश्नच मूर्खपणाचा अथवा विवेकहीन ठरतो. पौर्णिमेच्या दुधाळ चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या ताजमहालात जाऊन जर कोणी असा प्रश्न केला की, मला तर या अतिसुंदर वास्तुचा निर्माताच दिसत नाही. या संगमरवरी शिलांमधून ताजमहालाचा निर्माता प्रकट करून दाखवा, तर मात्र हे बुद्धीचे दिवाळे निघाल्याचेच लक्षण ठरेल. जर कोणी असा विचार करीत असेल की, या भूगर्भातून अचानक आणि आपोआपच संगमरवरीच्या शिला बाहेर आल्या. एका विशिष्ट मापानुसार आणि विशिष्ट आकारात त्या आपोआप घडल्या गेल्या, आपोआपच त्यावर कलाकुसरीचे आणि नकाशीचे काम झाले, आपोआपच ताजमहालाच्या वास्तुचा भव्य आराखडा त्याच्या आकारानुरूप तयार झाला, मग आपोआपच शिला एकमेकांवर आराखड्यानुसार चढत गेल्या आणि ही भव्य-दिव्य आणि जगातील सर्वांग सुंदर वास्तु उदयास आली. मग असा विचार करून त्याने जर असा प्रश्न उपस्थित केला की, जर ही कौशल्यपूर्ण आणि सर्वांग सुंदर वास्तु आपोआप उदयास आली नसेल, तर मग या वास्तुचा निर्माता याच वास्तुमधून प्रकट होऊन का बरे छाती ठेवून सांगत नाही की, ‘‘होय, मीच आहे या अतिविशाल व भव्य दिव्य वास्तुचा निर्माता!’’ तर असा प्रश्न विचारणार्यास आपण काय उत्तर देणार? तर उलट त्याच्या बुद्धीच्या किवा अकलेच्या स्थितीवरच प्रश्नचिन्ह उभे करू. आपण त्याच्या बुद्धीचे अथवा विचारशक्तीचे दिवाळे निघाले असल्याचेच प्रमाणपत्र देऊ. एखादे उत्पादन तयार होत असलेल्या कारखान्यासंबंधीसुद्धा जर कोणी विचारित असेल की, या कारखान्याचा तर कोणीच निर्माता कारखान्यात दिसत नाही, मला या कारखान्याच्या सुट्या भागात अथवा उत्पादनातच या कारखान्याच्या निर्मात्याचे दर्शन घ्यावयाचे आहे, तर हे मात्र शक्य नाही. मुळात त्याचा प्रश्न आणि विचारप्रणाली चुकीची आहे. अशा स्वरुपाच्या प्रश्नांविषयी आपणांसर्वांची भूमिका अशी आहे की, कोणतीही सुंदर, कौशल्यपूर्ण, मनोरम, शक्तीशाली व भव्य-दिव्य वास्तु पाहून जर कोणी असा प्रश्न उपस्थित करीत असेल की, मला या भव्य-दिव्य, कौशल्यपूर्ण आणि नियमबद्ध वास्तु अथवा कारखान्याच्या निर्मात्याचे दर्शन अगदी येथेच घडावे, तर त्याचा प्रश्नच मुळात चुकीचा आणि निराधार आहे. आपणांसर्वांचीच भूमिका अशी असेल की, या प्रश्नकर्त्याची विचारशक्ती नष्ट पावलेली आहे.
नेमका असाच प्रकार एका अत्यंत आणि असामान्य विषयासंबंधी आहे. एखादी व्यक्ती जर हट्ट करीत असेल की, मी ईश्वराचे अस्तित्व अगदी तेव्हाच मान्य करील, जेव्हा तो स्वतःहून माझ्यासमोर प्रकट होईल, अथवा मी त्याला माझ्या डोळ्यांनी पाहीन किवा माझ्या कानाने त्याचा आवाज ऐकेन अथवा मी त्यास स्पर्श करून पाहीन. तर हे मात्र शक्य नाही. कारण सृष्टीतील प्रत्येक वस्तुला पाहून आपण त्या वस्तुच्या निर्मात्यास ओळखू शकतो. मात्र त्या प्रश्नकर्त्याची मागणी अशी आहे की, मी या सृष्टीतील वस्तूच्या निर्मात्यास याच सृष्टीत पाहून त्याचे अस्तित्व स्वीकार करेन, तर त्याची ही मागणी कोणत्याही प्रकारे योग्य नाही.
उत्पादकाचे दर्शन उत्पादनात घडत नसते
ही बाब स्वाभाविक आहे की, उत्पादनास पाहिल्यावर आपला विचार निश्चितच उत्पादक अथवा निर्मात्याकडे जातो. निर्मितीस पाहून निर्मात्याच्या अस्तित्वाचा स्वीकार करण्यासाठी फार मोठ्या तत्त्वज्ञानाची अथवा संशोधनाची गरज नसते. ही बाब अतिशय स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. वैज्ञानिक असो, तत्त्वज्ञ असो की साधारण विचारसरणीचा माणूस असो, उत्पादन अथवा निर्मितीस पाहून निर्मात्याचा विचार येणे हे स्वाभाविक आहे. मात्र या उत्पादित वस्तुंमध्ये सूक्ष्मदर्शी यंत्र लावून पाहिल्याने या वस्तुंचा निर्माता मुळीच दिसणार नाही. अशा प्रकारचा प्रयत्न केवळ निष्फळच नव्हे तर हे संपूर्ण कार्यच मूर्खपणाचे ठरेल. वस्तुस्थिती अशी आहे की, उत्पादन किवा निर्मिती आणि निर्मात्याचे अस्तित्व अत्यंत भिन्न असते. त्यामुळे निर्मितीमध्ये निर्मात्याचे अस्तित्व शोधणे, हे काही विवेकतेचे आणि बुद्धिमत्तेचे लक्षण नाही, शिवाय हे शक्यसुद्धा नाही. एखादी निर्मिती पाहिल्यावर आपण आपल्या केवळ विचार शक्तीच्या आधारावर हे ठरवू शकतो की, या निर्मितीचा निर्माता अवश्य आहे. आपण या जगात वावरत असताना प्रत्येक निर्मितीस पाहून निर्मात्याच्या अस्तित्वाचा मनोमन स्वीकार करतोच.
जर कोणी ईश्वराचे अस्तित्व आपल्या विचारशक्तीच्या आधारावर स्वीकारण्यास तयार नसेल, तसेच पाहिल्याशिवाय, चाखल्याशिवाय, ऐकल्याशिवाय जर कोणी ईश्वराचा अर्थात सृष्टीच्या निर्मात्याचा स्वीकार करण्यास तयार नसेल, तर मग त्याच्यासाठी नाकारण्याचा अथवा अस्वीकृतीचा मार्ग मोकळा आहे. मात्र या अस्वीकृतीबरोबरच अथवा ईश्वराचे अस्तित्व नाकारण्याबरोबरच त्याला हेसुद्धा स्वीकारावे लागेल की, ही सृष्टी आणि यातील प्रत्येक वस्तू(अर्थात निर्मिती) आपोआपच अस्तित्वात आली. या सृष्टीचा आणि यातील प्रत्येक वस्तूचा कोणीच निर्माता नाही.
एखाद्या निर्मितीस इंद्रिय-माध्यमाने पाहण्याच्या दोन अनिवार्य अटी आहेत. प्रथम अशी की, निर्मात्यास उद्योगनिर्मितीच्या आत नव्हे तर बाहेर शोधावे आणि द्वितीय अट अशी की, उद्योगनिर्मितीच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत संपूर्ण पर्व दृष्टीसमोर असावे. ज्या पेनाचा वापर करून मी लिहित आहे, त्या पेनाचा अगर लेखणीचा निर्माता जर मला पाहावयाचा असेल, तर मला पेनाचा निर्माता पेनाच्याआतमध्ये कधीच सापडणार नाही. उलट त्याचा निर्माता पेनाच्या बाहेरच सापडेल. शिवाय पेन अगर लेखणी निर्माण होण्याचे संपूर्ण पर्व पूर्णपणे पाहिल्यानंतरच हे ठरविता येणे शक्य आहे की, याच्या निर्मितीमध्ये कोणकोणते हात कार्यरत आहेत, याबरोबरच मला हेसुद्धा पाहावे लागेल की, पेन अगर लेखणीच्या निर्मितीचा कारखाना कोणी स्थापन केला? यामध्ये कोणाचे बुद्धीकार्य आणि भांडवल लागले आहे? या सर्व बाबी आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतरच मी असे छातीठोकपणे सांगू शकतो की, मी पेनाच्या निर्मात्यास स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.
परंतु मी जर पेनाच्या आत त्याचा निर्माता शोधत असेल किवा ज्या वेळी पेन तयार होऊन माझ्या हातात आला, त्या वेळी मी या पेनाच्या निर्माणकर्त्यास आपल्या डोळ्यांनी पाहण्याचा हट्ट धरीत असेन, तर मात्र माझी ही इच्छा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. पेनाच्या निर्माणकर्त्यास पाहणे केवळ अशाच परिस्थितीत शक्य होईल, जेव्हा पेनाच्या उत्पादनाच्या सर्व प्रक्रिया आपल्या डोळ्यांसमोर घडतील. याशिवाय आपण ज्याला पेनाचा निर्माणकर्ता ठरवू, तर ते प्रयोगाने अथवा अनुभवाने नव्हे तर अंदाजानेच ठरवू. उदाहरणार्थ, पेनावरील शिक्क्यावरून आपण हे ठरवतो की, हा पेन कोणत्या कंपनीने आणि कोणत्या देशात तयार झाला. बर्याच वेळा असे घडते की, एखादे उत्पादन एके ठिकाणी होते आणि त्यावर दुसर्याच कंपनीचा शिक्का मारण्यात येतो. या शिवाय पेनावरील कंपनीचे नाव मिटले, तर आपण त्याच्या बनावटीवरून अंदाज लावू शकतो की, हा पेन कोणी तयार केला किवा कमीतकमी एवढा तरी विचार करतो की, हा पेन कोणा मानवाने तयार केला असेल. एखादी व्यक्ती असादेखील विचार करू शकते की, हा पेन आपोआपच तयार झाला असावा. मात्र या दोन्हीही परिस्थितीत पेन निर्माण करणार्यास पाहिलेले अथवा अनुभवलेले नसते. केवळ अनुमान अथवा कयासानेच ठरविण्यात आलेले असते. तसेच एखाद्या व्यक्तीस जर या पेनाचा निर्माणकर्ता स्वीकारण्यात आले, तर हेसुद्धा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून किवा स्वतः अनुभव घेऊन नव्हे तर विचारशक्तीच्याच आधारावर स्वीकारण्यात आलेले असते. अर्थात तुम्ही जर पेन निर्मिताची संपूर्ण कार्यप्रणाली प्रत्यक्ष डोळ्यांनी न पाहता इतर पद्धतीने पेन तयार करणार असाल तर, हे प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावर नव्हे तर अंदाजावरच करीत आहात आणि हीच परिस्थिती इतर सर्वच उत्पादननिर्मितीची आहे.
निर्माणकर्त्यास आपण विवेकशक्तीने ओळखतो
वस्तुस्थिती अशी आहे की, आपल्याला निर्माणकर्ता हा उत्पादननिर्मितीत नव्हे, तर उत्पादननिर्मितीच्या बाहेरच सापडतो. तसेच डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहून नव्हे तर विचारशक्तीच्याच आधारावर आपण निर्मात्यास ओळखतो आणि स्वीकारतो. निर्माणकर्त्यास ओळखण्यासाठी व स्वीकारण्यासाठी इंद्रियांच्या किवा साधनांच्या माध्यमाने माहिती करून घेण्याची अट असेल, तर इतर सर्वच उत्पादननिर्मितीबाबतीत हे मान्य केल्याशिवाय चालणार नाही की, या उत्पादननिर्मितीचा कोणीच निर्माणकर्ता नसून या सर्व वस्तू आपोआपच तयार झाल्या. ही बाब निश्चितच निराधार आणि मूर्खपणाची ठरेल. मात्र या गोष्टीचा विलाज काय आहे की, या अथांग आणि भव्य-दिव्य सृष्टीच्या निर्माणकर्त्यासंबंधी मोठमोठे विचारवंत असण्याचा दावा करणारेसुद्धा नेमका हाच मूर्खपणा करीत आहेत. एकीकडे त्यांची अशी मागणी आहे की, या सृष्टीचा निर्माणकर्ता या सृष्टीतच दिसावा तर दुसरीकडे असा हट्ट आहे की, सृष्टीचा निर्माणकर्ता अर्थात ईश्वर त्यांना डोळ्यांनी दिसावा. एवढ्यावरही त्यांचे भागत नाही. दुसर्या प्रकारच्या मूर्खपणास ते प्रगत विचारधारा आणि विचारशक्तीचे नाव देतात आणि ईश्वराचा स्वीकार करण्यास बौद्धिक पुराव्यांविरुद्ध व प्राचीनवादी असल्याचा दावा करतात.
मात्र कोणी जर असा हट्टच धरीत असेल की, या समस्येचे समाधान इंद्रिय आणि साधनसामग्रीच्याच माध्यमाने करण्यात यावे, तर यासाठीसुद्धा आमची पूर्ण तयारी आहे. परंतु यासाठी आवश्यक अटींची पूर्तता त्याला करावी लागेल. या हट्ट करणार्या व्यक्तीस सृष्टीनिर्माणकर्त्याचा शोध सृष्टीच्या आत नव्हे, तर सृष्टीच्या बाहेर घ्यावा लागेल. मग यासाठी या गोष्टीचीसुद्धा नितांत गरज आहे की, तुम्हाला सृष्टीच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत घडणार्या सर्व प्रक्रिया आपल्या इंद्रियांनी अथवा साधनसामग्रीच्या माध्यमाने किवा आपल्या डोळ्यांनी पाहाव्या लागतील. मात्र जर या आवश्यक अटींची पूर्तता करणे शक्य नसेल,(निश्चितच या अटींची पूर्तता शक्य नाही) तर इंद्रिय आणि प्रायोगिक साहित्यांच्या माध्यमाने या समस्येचे समाधान शक्य नाही, अर्थात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणे शक्य नाही. तुम्ही या सृष्टीचा कोणीतरी निर्माणकर्ता आणि व्यवस्थापक स्वीकार करा अथवा ही संपूर्ण भव्य-दिव्य सृष्टी आपोआप अस्तित्वात आली असल्याचे स्वीकार करा. यापैकी कोणतीही बाब ठरविण्यासाठी इंद्रिय आणि प्रायोगिक साहित्यांच्या माध्यमांचा वापर शक्य होणारच नाही. याचा योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला विवेकशक्तीचाच वापर करावा लागेल. मात्र तुम्हाला ही निर्णयप्रणाली आवडत नाही!
आपण ज्या भव्य-दिव्य, अनंत व अथांग सृष्टीत जीवन जगतो, त्या सृष्टीचा प्रारंभ आणि शेवट या दोन्ही बाबतीत आपल्याला काहीही माहीत नाही. कारण या सृष्टीची निर्मिती आपल्या डोळ्यांसमोर झाली नाही, तर उलट ती परिपूर्ण स्वरुपात अगदी तयार परिस्थितीत आयती आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आपल्याला अद्यापही नेमके माहीत नाही की, ही सृष्टी निर्माण होऊन किती काळ लोटला आणि किती काळापर्यंत टिकणार आहे. आपण तर या सृष्टीच्या दरम्यानच्या काही मर्यादित काळासाठी जन्माला आलो आहोत. या ठिकाणी एका उर्दू कवीच्या दोन ओळी आठवतात,
‘‘सुनी हिकायतें हस्ती तो दरमियां से सुनी, न इब्तेदा की खबर है, न इन्तिहा मआलूम.’’
अर्थात : ‘‘कहानी ऐकली तर तीसुद्धा मध्यंतरातूनच, ना प्रारंभ माहीत आहे ना शेवट.’’ आपण विज्ञानाच्या क्षेत्रात किती जरी प्रगती केलेली असली, तरी आपण आपल्या इंद्रिय आणि प्रायोगिक साधनसामग्रीचा वापर करून या सृष्टीच्या निर्माणाचे स्त्रोत आणि काळ पाहू शकत नाही, सृष्टीतील सतत घडणार्या प्रक्रियासुद्धा पाहू शकत नाही. या सृष्टीचा अंत कधी होईल, हेसुद्धा माहीत करून घेऊ शकत नाही. या सृष्टीत ज्या प्रक्रिया सतत घडत असतात, त्यांपैकी भविष्यात घडणार्या प्रक्रियांची साधी कल्पना करण्याचेसुद्धा तंत्र आपल्याकडे नाही. या भव्य-दिव्य, अथांग आणि अनंत असणार्या सृष्टीच्या वय आणि क्षेत्रफळापेक्षा आपली ही मानवी विचारशक्ती अथवा विवेकशीलता खूपच क्षुल्लक आणि कमी आहे. केवळ विचार आणि विवेकशीलताच नव्हे तर आपले वय, कार्यक्षमता, इंद्रियक्षमता आणि दृष्य व श्रवणशक्तीसुद्धा अत्यंत किरकोळ आहे. आपले अनुमान, आपले निष्कर्ष आणि शोधबुद्धी वगैरे सर्वच बाबी कुचकामी ठरतात. ज्या सृष्टीच्या केवळ बाह्य दर्शनानेच आपल्या संपूर्ण शक्ती पार थकून जातात आणि संपूर्ण क्षमतांचे अवसान गळून पडते, त्या अथांग आणि अनंत सृष्टीची केवळ लांबी, रूंदी, परिघ, त्रिज्या, क्षेत्रफळ व घनफळ मोजणे शक्यच नाही. याकरिता कोणतेही साहित्य अपुरे पडेल, ज्या अनंत व अथांग सृष्टीच्या सीमासुद्धा ओलांडणे शक्य नाही, तिच्या मर्यादांची कल्पना करणेसुद्धा शक्य नाही. त्या सृष्टीची निर्मिती आणि तिच्यात घडणार्या प्रक्रिया, तसेच तिच्या व्यवस्थापन व व्यवस्थेविषयी आपण इंद्रिय आणि प्रायोगिक साधनसामग्रीच्या माध्यमाने एखादा निर्णय करण्याचे ठरविले तर हा किती मोठा आणि अतिभव्य, अतिदिव्य, अनंत आणि अथांग मूर्खपणाच ठरेल! ही वस्तुस्थिती स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच नाही की, आपल्या इंद्रियांची शक्ती आणि आपण तयार केलेली साधनसामग्री सृष्टीच्या संपूर्ण शोध प्रक्रियेत कुचकामी ठरतात. यासंबंधी तर आपल्याला आपल्या बुद्धी आणि विवेकशक्तीचाच वापर करावा लागेल. याच माध्यमाने आपण या मार्गात वाटचाल करावी.
विज्ञानाची सर्वच स्पष्टीकरण बौद्धिक आहेत
सृष्टीच्या बाबतीत तुमची विचारसरणी अशी जरी असली की, तिचे अस्तित्व हे केवळ काल्पनिक आहे किवा ती अनादी काळापासून असून अविनाशी आहे, तसेच तुमची अशी विचारसरणी जरी असली की, ती आपोआप अस्तित्वात आली आणि आपोआप तिचे कार्यचक्र चालू आहे किवा अशी विचारसरणी जरी असली की, एका सार्वभौम आणि सर्वशक्तिमान ईश्वराने तिची निर्मिती केली आहे आणि तोच या सृष्टीचे कार्य चालवीत आहे, तर यांपैकी तुमची कोणतीही विचारसरणी असू द्या, मग ती खरी असो अथवा खोटी असो, या सर्वच विचारसरणी अगर सिद्धान्ताचा आधार हा मुळात बौद्धिक विचारसरणीच आहे. या विचारसरणींशी इंद्रिय आणि प्रायोगिक सामग्रीचा कवडीमात्र संबंध नाही. तुम्ही या सृष्टीला अगदीच अनादी काळापासून स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नाही, शक्यही नाही. तिच्या घडणार्या घटनाक्रमाच्या शृंखलेतील प्रत्येक कडी पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी तुमचे कोणतेच इंद्रिय अथवा साहित्यसामग्री कामी आले नाही. तसेच यासाठी कोणतेही प्रयोग करून निष्कर्ष मिळाला नाही आणि शक्यसुद्धा नाही. तर मग खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही कशाच्या आधारे हा सिद्धान्त मांडता किवा असा निर्णय घेता की, ही सृष्टी अनादी काळापासून आणि चीरकालीन आहे. तुम्ही सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी हजर नसूनसुद्धा आणि सृष्टीची संपूर्ण व्यवस्था तुमच्या दृष्टीसीमांच्या आत नसूनसुद्धा तुम्ही इंद्रिय आणि शोध साहित्यांच्या आधारावर हा निर्णय कशासाठी घेऊ शकता की, ही सृष्टी आपोआपच अस्तित्वात आली आणि संपूर्ण कार्यचक्र हे आपोआपच चालू आहे अथवा या उलट असा निर्णयसुद्धा कशासाठी घेऊ शकता की, या सृष्टीचा निर्माणकर्ता आणि संचालक हा सर्वशक्तिमान ईश्वर आहे. एवढेच नव्हे तर तुम्हाला तुमच्या इंद्रियांच्या शक्तीमुळे आणि प्रायोगिक साहित्याच्या माध्यमाने हेसुद्धा समजले नाही की, या सृष्टीचे अस्तित्वच नसून ही केवळ एक कल्पना आहे अथवा केवळ कल्पनांवर आधारित मानवी भ्रम आहे. इंद्रिय आणि साहित्यांच्या माध्यमाने तुम्हाला मिळणारी माहिती केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित आहे की, आपण ज्या ठिकाणी जगत आहोत, त्या सृष्टीचे अस्तित्व आहे आणि तिचे कार्यचक्र चालू आहे.. बस, एवढेच! या शिवाय तुम्ही जे काही सादर करता, ते तुमच्या बौद्धिक विचारशक्तीवर आधारलेले निर्णय आहेत. या निर्णयांचा संबंध इंद्रियांच्या माध्यमाने मिळणार्या माहितीशी अथवा अनुभव किवा प्रयोगाशी मुळीच नाही.
विज्ञानाकडे ‘का?’ चे उत्तर नाही
ही सृष्टी का निर्माण झाली आणि तिचे हे सतत चालू असलेले कार्यचक्र कशाकरिता सुरू आहे? हिचा प्रारंभ झाला का आणि अंत होईल का? हिचा कोणी निर्माता आणि चालक आहे का अथवा ती आपोआपच अस्तित्वात आली आणि आपोआपच चालू आहे? तर या अतिमहत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीतच. पंचेंद्रियांच्या आणि साहित्यसामग्रीच्या आधारावर या प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाने शोधून काढली नाहीत. पंचेंद्रियांचा आणि साहित्यांचा वापर करून अर्थात वैज्ञानिक प्रयोगाद्वारेसुद्धा केवळ एखाद्या क्षुल्लक बाबींविषयी जी माहिती अथवा ज्ञान प्राप्त होते, ते केवळ एवढेच की, या बाबीचे अगर पदार्थाचे गुणधर्म काय आहेत आणि त्याची घटकात्मक रचना कशी आहे. मात्र हे गुणधर्म का आहेत आणि त्यातील घटकांची रचना अशी का आहे, याच घटकांच्या अशाच स्वरुपाच्या रचनेमुळे हाच पदार्थ का तयार होतो वा अमुकच पदार्थ ‘का’ तयार होतो, तर मात्र विज्ञानाजवळ ‘का’ या प्रश्नाचे उत्तर मुळीच नाही. उदाहरणार्थ, आपल्याला हे माहीत आहे की, हायड्रोजन आणि ऑक्सीजनच्या मिश्रणाने पाणी तयार होते. मात्र या दोन्ही घटकांच्या मिश्रणाने पाणीच का तयार होते, शिवाय पाण्याचा गुणधर्म हा त्याच्या घटकांच्या गुणधर्मापेक्षा इतका विपरित का आहे? अर्थातच हायड्रोजनचा गुणधर्म आहे की, तो स्वतः जळतो आणि ऑक्सीजन जळण्यासाठी मदत करतो. तेव्हा या दोन्हींच्या मिश्रणाने तयार होणारे पाणी हा विझविणारा पदार्थ का तयार झाला? खरे पाहता जळणार्या आणि जळण्यास मदत करणार्या या दोन घटकांच्या मिश्रणाने तयार होणार्या पदार्थाचे गुणधर्म जाळणे अथवा जळणे असावयास हवे होते. अर्थात जळत असलेल्या आगीत पाणी ओतताच तिच्यात आणखी भडका व्हावयास हवा होता. मात्र पाण्याचा गुणधर्म आगीच्या गुणधर्माविरुद्ध आहे. असे का? या ‘का’ चे उत्तर विज्ञानाजवळ नाही. अशा असंख्य उदाहरणांपैकी आणखीन एक उदाहरण आपणास दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरत असलेल्या मिठाचे देता येईल. कारण हेच मीठ सोडियम आणि क्लोरीन या दोन घटकांचे मिश्रण आहे. सोडियमचा गुणधर्म तर विचित्रच आहे. अगदी हाताचा स्पर्श होताच पेट घेणारा पदार्थ म्हणजे सोडियम आणि क्लोरीन म्हणजे एक विषारी गॅस. मात्र या दोन्हींचे मिश्रण होताच मीठ तयार होते आणि मिश्रित घटकांचे दोन्ही गुणधर्म अर्थात ज्वालाग्रही असणे व विषारी असणे मिठातून नष्ट झालेले आहे. मीठ हे स्पर्श होताच जळतही नाही आणि ते विषारीसुद्धा नाही. असे का बरे? तर अशा प्रकारच्या प्रत्येक ‘का’ चे उत्तर पंचेंद्रियांच्या अथवा वैज्ञानिक साहित्यांचा वापर करूनदेखील सापडले नाही. मग ही बाब खरोखरच विचार करण्यासाठी आहे की, या अत्यंत क्षुल्लक ‘का’ चे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही, पंचेंद्रियांच्या आणि वैज्ञानिक साहित्याच्या माध्यमानेसुद्धा हे ‘का’ चे उत्तर सापडत नाही, ‘‘तर ही सृष्टी का निर्माण झाली?’’ या प्रश्नाचे उत्तर कसे सापडेल? या सृष्टीला कोणीतरी निर्माणकर्त्याने निर्माण केले का?’ याचे उत्तर कसे सापडेल की सृष्टी कोणाच्या आदेशावर एवढी व्यवस्थितपणे आणि नियमबद्धरीत्या चालते? याचे उत्तर कसे सापडेल. कारण वस्तुस्थिती अशी आहे की, या ‘का’ चे उत्तर पंचेंद्रिये आणि शोध-साहित्यांच्या माध्यमाने कधीच आणि कोणासही सापडणे शक्य नाही. अर्थातच ईश्वराचा ‘स्वीकार’ असो की ‘नकार’ या दोन्ही बाबी विज्ञानाशी संबंधित नसून माणसाच्या बुद्धीशी संबंधित आहेत. वैचारिक पुराव्यांच्याच आधारांवर ईश्वराचा स्वीकार अथवा नकार करता येईल. पंचेंद्रियांच्या आधारावर आणि साधन-सामग्रीच्या नास्तिकताही सिद्ध होत नाही व आस्तिकताही सिद्ध होत नाही.
Labels:
[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Theme images by 5ugarless. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget